शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली.
नागपूर, 21 डिसेंबर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. तर 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला महात्मा फुले कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली, ती परिपूर्ण नाही. सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. तो पाळलेला नाही, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी पक्षांनी मात्र या योजनेचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा दावा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
- 'प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार'
- पूर्व विदर्भात स्टील फॅक्ट्री उभारणार
- सिंचनाचा एकही प्रकल्प स्थगित केला नाही
- 'कुठल्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही'
- सिंचनाचा कोणाताही अनुशेष बाकी ठेवणार नाही
- समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार
- समृद्धी महामार्गाची जबाबदारी आता आमची
- 'शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार'
- रस्त्यांच्या सुधारणेसाठी गतीशील चालणा देणार
- विदर्भात आरोग्यसेवेत सुधारणा करावी लागणार
- पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे मागणी केलीये
- गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन
- 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार